अकोला - गुलाबी वादळामुळे जिल्ह्यात संततधार आणि अतिवृष्टीचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असला तरी पावसाने मात्र मध्यम स्वरूपात हजेरी लावल्याने चार दिवसांपासून जिल्ह्यात मुरता पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्व प्रकल्प हे शंभर टक्के भरले असल्याने पाटबंधारे विभागाकडून या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 765 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षीपेक्षा 111 टक्के पाऊस जास्त झाला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे याबाबत माहिती देताना पावसामुळे थंडावा -
हवामान विभागाने गुलाबी चक्र वादळामुळे विदर्भात जोरदार किंबहूना अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला होता. जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पावसानेही चांगलीच बॅटिंग केली आहे. या चार दिवसांमध्ये पावसाने मध्यम स्वरूपात हजेरी लावली आहे. या पावसामुळे अकोल्यातील उफाड्याची वातावरण कमी झाले आहे. या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अतिवृष्टीसारखा पाऊस झाला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. तसेच प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणीसाठा निर्माण होत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग क्षमतेनुसार करण्यात येत आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र, पाऊस मध्यम स्वरूपाचा पडल्यामुळे नागरिकांना यावेळी या पावसाचा कुठलाही त्रास झालेला नाही.
पाण्याचा आनंद घेताना मुले हेही वाचा -VIDEO : गोदावरी नदीच्या पुरात युवकांची जीवघेणी स्टंटबाजी
दरम्यान, अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके ऍक्शन मोडवर ठेवण्यात आली आहे. प्रत्येक तहसील ठिकाणी व्यवस्था उभी करण्यात आली आहे. जेणेकरून कठीण परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविणे शक्य होईल. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीकाठच्या जवळ असलेल्या शेतामध्ये पाणी साचले आहे. लाखो हेक्टरवरील पिके खराब झाली आहे. यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि कृषी विभाग यांच्याकडून नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.