अहमदनगर- पुणे बस स्थानकासमोर 29 एप्रिलला किरकोळ वादातून एका युवकावर काही युवकांनी हल्ला केला होता. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रेम ऊर्फ किरण जगताप, असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
या हल्ल्यात जखमी झाल्यामुळे प्रेमला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार चालू असताना तो कोमात गेला होता. त्याला आज सकाळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टेशन रोड परिसरात तणावाचे वातावरण होते. यानंतर प्रेमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पुण्यात मारहाण झालेल्या अहमदनगरच्या युवकाचा मृत्यू कोतवाली पोलिसांनी या मारहाणप्रकरणी त्याच वेळी गुन्ह्याची नोंद केली आहे. मात्र, घटनेला 1 महिना उलटूनही एकाही आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेला महिना होऊनही पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कारवाईबाबत शंका व्यक्त करत नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी जबाबदार अधिकाऱयांवर कारवाईची मागणी केली आहे.
प्रेमच्या नातेवाईकांनीही याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करावी तसेच आरोपीना अटक करावी, अन्यथा मुतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.