शिर्डी (अहमदनगर) - शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या कारभाराविरोधात शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने शिर्डी साईबाबा संस्थानचे कामकाज पाहण्यासाठी चार सदस्यीय तदर्थ समितीची नेमणूक केली. मात्र, ही समितीही कामगारांचे प्रश्न सोडवत नसल्याने कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याची सुरूवात आज (दि. 7 सप्टें.) काळ्या फिती लावत कामावर हजर होत केली आहे.
आज कामगारांनी काळ्या फिती लावत कामकाज केला आहे. तर येत्या गुरुवारी (दि. 10 सप्टें.) साई संस्थान कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थ साई मंदिराच्या गेट क्रमांक चार समोर घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. येत्या गुरुवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत घंटानांद आंदोलन करुन महाआरती करण्यात येणार असून रविवारी (दि. 13 सप्टें.) शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मुकमोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनानंतरही तदर्थ समितीला जाग आली नाही तर, लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी साई संस्थानचे कर्मचारी राजेंद्र जगताप आणि प्रताप कोते यांनी दिला आहे.