अहमदनगर -जीवनात काहीतरी केलेच पाहिजे हे तिचे ध्येय होते. मात्र, शिक्षण आड येत होते. जास्त शिक्षण नसल्याने सरकारी-खासगी कार्यालयात नोकरी मिळणार नव्हती. मात्र, ती थांबली नाही. तिने पिठाची चक्की चालवली. कधी ती रिक्षा चालवताना दिसते. तर कधी वेग-वेगळ्या क्लाइन्ट्ससाठी ती कारवर बदली चालक म्हणून दिसते. अशा अष्टपैलू महिलेचे नाव आहे निलीमा मनीष खराडे. आंतराराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने 'दामिनी' या मालिकेच्या माध्यमातून घेतलेला हा विशेष आढावा.
निलिमा खराडे या त्यांच्या या कामात सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत बिझी असतात. शिक्षण नाही म्हणून नोकरी मिळत नसल्याचे पाहून निलीमा यांनी रिक्षा, चारचाकी चालवण्याचा निर्णय घेतला. स्त्री असूनही त्यांनी या प्रश्नांचे उत्तरे शोधली. त्यांनी सुरुवातीच्या काळात पिठाच्या चक्कीवर काम केले. जे पुरुष करू शकतात ते एक स्त्री पण नक्कीच करू शकते, असा त्यांना विश्वास होता. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना पण त्यांनी आतापासूनच आपल्याला जे येते ते शिकवण्याचा प्रयत्न ठेवला आहे.