अहमदनगर (शिर्डी)- साईबाबा मंदिरालगत असलेल्या साईबाबांच्या चावडी मंदिरात एका महिलेने संस्थानच्या सुरक्षारक्षकाची नजर चुकवून मंदिरात प्रवेश केला. याबाबत महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुरक्षेच्या नावाखाली मंदिराची दक्षिणबाजू पुर्णतः बॅरिकेटींग करुन बंद केली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा अडचणीचा सामना कारावा लागत आहे.
सुरक्षा रक्षकाची नजर चुकावत मंदिरात वाढदिवस.. गुरुवारी एका महिलेने संस्थानच्या सुरक्षा रक्षकाची नजर चूकवत चावडी मंदिरात प्रवेश केला. मंदिरात साईंच्या फोटोसोबत सेल्फी काढत वाढदिवस साजरा केला. हा सेल्फी सोशल मिडियावर व्हायरल केला. मंदिर संस्थेला याबाबत माहिती मिळताच महिलेवर सुरक्षा विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर साई मंदिराची दक्षिणबाजू म्हणजेच व्दारकामाई, चावडी, नाट्यगृह, मारुती मंदिर परिसर बॅरिकेटींग करत निर्मनुष्य केला आहे. नाट्यगृहाच्या बाजूला चार भागात बॅरिकेटींग करण्यात आले आहे. तर पालखीरोड चावडी शेजारी दोन बॅरिकेटींग, चावडी समोर एक आणि चावडीच्या वरच्या भागात एक बॅरिकेटींग करण्यात आले आहे. व्दारकामाईचे गेटही बंद केले आहे.
लॉकडाऊनमध्ये साईबाबा मंदिर बंद आहे. तरिही स्थानिक भाविक सकाळी साई मंदिराच्या कळसाचे, व्दारकामाईचे तसेच चावडीचे बाहेरुन दर्शन घेत होते. दुपारच्या आरती दरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळत बाहेरुन आरती देखील करत होते. मात्र, आता त्यांना बॅरिकेटींगच्या बाहेरुनच हात जोडून दर्शन घ्यावे लागत आहे.
त्यामुळे महिलेने चावडीत प्रवेश केल्यानंतर सर्व ग्रामस्थांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी म्हटले आहे.