अहमदनगर - सैराट चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेल्या आकाश ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अहमदनगर सायबर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शिवदर्शन उर्फ शिवतेज नेताजी चव्हाण असे या आरोपीचे नाव असून तो पिंपरी-चिंचवड शहरात राहतो.
आरोपी शिवदर्शनने सैराट फेम आकाश ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले होते. त्याची चार महिन्यांपूर्वी अहमदनगरमधील एका महिलेशी या माध्यमातून ओळख झाली. तो त्या महिलेशी चॅटिंग करत असे. यातून त्याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. यानंतर त्याने आर्थिक अडचण असल्याचा बहाणा करत त्या महिलेकडून मंगळसूत्र आणि एक अंगठी अहमदनगर येथे येऊन घेतली.
शिवदर्शनने त्यानंतर आपले बनावट फेसबुक अकाऊंट बंद केले. तेव्हा महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तेव्हा तिने अहमदनगरच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली. तिच्या तक्रारीवरुन सायबर सेलने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.