अहमदनगर- कोरोनाचे घोंगावणारे संकट आणि लॉकडाऊनच्या मजबुरीत एका महिलेने रस्त्याकडेला असलेल्या एटीएममध्ये चिमुकलीला जन्म दिला. स्थानिकांनी वेळीच मदत केल्याने सध्या आई आणि बाळ शासकीय रुग्णालयात सुरक्षित आहेत.
लॉकडाऊनमुळे गर्भवती महिलेचा गावाकडे जाण्यासाठी पायी प्रवास... एटीएममध्ये झाली प्रसूती - अहमदनगर
गावाकडे पायी जात असताना एका गर्भवती महिलेला नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा इथे अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. तिच्या कुटुंबीयांनी तिला बडोदा बँकेच्या एटीएम मध्ये नेले. वडाळा आरोग्य केंद्रातील परिचारिका सोनाली न्यालपेल्ली आणि वनिता काळे यांनी महिलेचे बाळांतपण केले. बाळाची आणि आईची प्रकृती व्यवस्थित आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा-वाघोली येथे मोलमजुरी करणारे एक कुटुंब लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यवतमाळला अहमदनगर जिल्ह्यातून औरंगाबाद रस्त्याने जात होते. पायी जात असताना त्यातील एका गर्भवती महिलेला नेवासा तालुक्यात नगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा इथे अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. या अवघड परिस्थितीमध्ये महिलेला तिच्या कुटुंबीयांनी बडोदा बँकेच्या एटीएम मध्ये आडोशाला नेले. यावेळी याठिकाणापासून जवळच असलेल्या वडाळा बहिरोबा येथील कामगार तलाठी श्रीकांत भाकड यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वडाळा आरोग्य उपकेंद्रातील परिचारिका सोनाली न्यालपेल्ली व वनिता काळे यांना बोलावून घेतले. त्यांनी या महिलेचे बाळंतपण एटीएम मधेच करत सुखरूप सुटका केली. महिलेने बँक ऑफ बडोदाच्या एटीएम मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला असून त्या बाळाचे वजन 2 किलो असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.बागवान यांनी सांगितले.
या घटनेची माहिती नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना कळताच यांनी तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांना सोबत घेऊन वडाळा बहिरोबा येथे धाव घेतली आणि तत्काळ त्या महिलेला नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाची आणि आईची तब्येत व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यानिमित्ताने स्थलांतरित कामगारांचा प्रश्न पुन्हा समोर आला असून कोरोनाच्या संकटाला धीराने आणि संयमाने तोंड देण्याची गरज निर्माण झाली आहे.