राहुरी (अहमदनगर)- राहुरी तालुक्यातल्या शेरी चिखलठाण येथे मळणी यंत्रात अडकून एका विवाहितेचा अपघाती मृत्यू झाला आहे. विजया वैभव काकडे(२४) असे मृत तरुणीचे नाव आहे. रविवारी दुपारच्या सुमारास मळणी करत असताना यंत्रात अडकल्याने विजया ही जखमी झाली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दुर्दैवी..! मळणी यंत्रात अडकून विवाहित तरुणीचा मृत्यू
मळणी यंत्रात अडकून विवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाजरीची मळणी करत असताना, डोक्याला बांधलेला स्कार्फ मळणी यंत्रात अडकल्याने ती तरुणी गंभीर जखमी झाली. मात्र, अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
विजया काकडे ही आपल्या शेतातील बाजरीची मळणी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी ट्रकरच्या साह्याने चालणाऱ्या मळणी यंत्राद्वारे मळणीचे काम सुरू होते. मळणी सुरू असताना यंत्रातील चाळणीवर साचलेले काड काढण्यासाठी गेली असता, तिच्या डोक्याचा स्कार्फ त्या यंत्राच्या शॉफ्टला अडकून गुंडाळला गेला आणि ती देखील त्या शॉफ्टकडे ओढली गेली. मळणी यंत्राला वेग खूप असल्याने ती देखील शॉफ्टसोबत गतीने फिरून जमिनीवर आपटली. त्यावेळी तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. विजया यांना तत्काळ लोणी येथील रुग्णालयात दाखल करून उपतार सुरू करण्यात आले.
विजया यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे उपाचारा दरम्यान विजया यांचा अखेर रविवारी रात्री मृत्यू झाला. विजया यांच्या मागे ३ वर्षांची एक आणि एक ११ महिन्यांची एक अशा दोन मुली आहेत. दरम्यान, या विवाहितेच्या अकाली झालेल्या मृत्युमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.