अहमदनगर - एअर इंडियाचे खाजगिकरण करणारे राज्यात एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा भडकावून वातावरण बिघडवत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केला आहे. एसटीचे विलीनीकरण करण्याची मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, एअर इंडियाचे खाजगिकरण का केले याबद्दल बोलायला हे तयार नाहीत असा प्रश्नही पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत इथे विविध विकासकामांचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
एअर इंडिया टाटांना देत एअर इंडियाचे खाजगिकरण केले (Merger of ST)
एसटी महामंडळाचे कामगार आपलेच शेतकऱ्यांची मुले आहेत. त्यांचा पगार वाढला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, गेल्या साठ वर्षात आतापर्यंत एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा कधी आला नाही. तो आत्ताच का आला? जे दोन-चार आमदार आंदोलनात उतरून कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावत आहेत त्यांना मला विचारायचे की केंद्रात कुणाचे सरकार आहे? कोण पंतप्रधान आहेत? असे म्हणत अजित पवार यांनी केंद्राने एअर इंडियाच्या केलेल्या खाजगिकरणावर आपला रोख नेत केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांनी एअर इंडिया टाटांना देत एअर इंडियाचे खाजगिकरण केले. आता त्यांच्याच पक्षाचे लोकं राज्यात एसटीच्या शासनात विलीनीकरणाचा अट्टाहास करत कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावत आहेत. मात्र, ते एअर इंडियाच्या खाजगिकरणावर ते का बोलत नाहीत? असा प्रश्न पवार यांनी भाजपला विचारला आहे.