शिर्डी (अहमदनगर) - राहाता तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व खबरदीचा उपाय म्हणून राहाता तालुक्यातील सर्व प्रमुख गावातील आठवडे बाजार व जनावरांचा बाजार 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश तहसीलदार कुंदन हिरे यांनी आज जारी केला आहे.
गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी राहाता व शिर्डी नगरपालिका कार्यक्षेत्र, संपूर्ण ग्रामीण भागात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये भरणारे जनावरांचे बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा बाजूस बसणारे तात्पुरते फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रेत्याबाबत स्थानिक प्राधिकरणाने योग्य ती दक्षता घेवून त्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत. हा बंदी आदेश येत्या 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.