अहमदनगर- संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विविध तयारी सुरू असल्याचे सांगितले असताना अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे जिल्ह्यातील लहान मुलांमध्ये कोरोनाचे किती रुग्ण आहेत याची आकडेवारी उपलब्ध नाही. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर दौऱ्यावर असताना त्यांना विचारले असता आम्ही आकडेवारीची कोणतीही लपवाछपवी करत नाही, सर्व माहिती उपलब्ध करत आहोत, असे उत्तर दिले. लहान मुलांसाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरचे कौतुक
अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या जम्बो कोविड सेंटरला आज (दि. 26 मे) पालकमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी आमदार लंके यांचे कौतुक त्यांनी केले. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्श असे हे हेल्थ सेंटर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.