महाराष्ट्र

maharashtra

कोपरगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

कोपरगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे येथील नागरिकांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येसगाव तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे.

By

Published : Apr 21, 2019, 11:14 PM IST

Published : Apr 21, 2019, 11:14 PM IST

तलावातील गाळ काढताना नागरिक

अहमदनगर - कोपरगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीदेखील नगरपालिका येसगावमधील तलावातील साचलेला गाळ काढण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पुढाकार घेत तलावातील साचलेला गाळ काढण्यास सुरुवात केली.

पाणी प्रश्नाबाबत माहिती देताना नागरिक

कोपरगाव शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे येणाऱ्या मे-जून महिन्यात मोठी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. नगरपालिकेच्या साठवण तलावात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रशासनाने हा गाळ काढून घेण्याची मागणी काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने तलावाची पाहणी करून देखील याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे काळेंसह शहरातील काही नागरिकांनी तलावाची पुजा करून हातात कुदळ-फावडे घेऊन तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली.

गोदावरी नदीच्या काठी असलेल्या कोपरगाव शहरातील नागरिकांना आज १२ दिवसांआड पिण्याचे पाणी येत आहे. या समस्येबाबत तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना शहरातील विविध समाजबांधव आणि काही सामाजिक संस्थांच्या वतीने निवेदने दिली. मात्र, याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे काही दिवसात कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटला नाही, तर २९ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा कोपरगाववासियांनी दिला आहे.

कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाणी साठवण तलावाचा साचलेला गाळ काढून थोडीफार का होईना तळ्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढली जाईल आणि कोपरगाव शहराला आज जेवढे पाणी मिळते त्यापेक्षा अधिक काळ पाणी मिळेल, या आशेने या कामाला सुरूवात केल्याची माहिती काळे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details