अहमदनगर - नाशिक धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीच्या पुराचे पाणी कोपरगाव शहरातील विविध भागात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील विविध भागात पाणी शिरल्याने, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
गोदावरीकाठी असलेल्या कोपरगाव शहरातील खंदकनाला, सप्तश्रीमळा, आयेशा कॉलनी, सुभाष नगर, राघोबादादा वाडा, निंबारा मैदान, हनुमाननगर, गजानन नगर आणि रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरात तसेच दुकानांत पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सध्याच्या पूर परिस्थितीमुळे प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे.