अहमदनगर- मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली म्हणून शरद पवारांनी अन्नत्याग आंदोलन केले असते तर मराठा समाजाला बरे वाटले असते, अशी प्रतिक्रिया माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. शहरात भाजपने सुरू केलेल्या कोविड सेंटरच्या कार्यक्रमाला तावडे उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना विनोद तावडेंनी शरद पवारांवर टीका केली.
भाजपचे नेते विनोद तावडे म्हणाले, की देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारे कृषी विधेयक आहे. त्याला विरोध म्हणून शरद पवार यांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. मात्र हा केवळ विरोधाला विरोधाचा भाग असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.
कोरोना काळात सामान्य कुटुंब आर्थिक अडचणीत आहेत. पालकांना मुलांची फी भरणे अशक्य झाले आहे. मात्र, एकीकडे महाविकास आघाडी सरकार फीसाठी सक्ती नको म्हणून आदेश काढते. तर सरकारमधीलच मंत्री जयंत पाटील यांची शिक्षण संस्था या आदेशाच्या विरोधात न्यायालयात जाते. यावरून सरकारला गरीब विद्यार्थ्यांचा किती कळवळा आहे, हे समोर येत असल्याची टीका तावडे यांनी यावेळी केली.