अहमदनगर -नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम वेगाने चालू आहे. मात्र, या कामामुळे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम काही काळासाठी बंद पाडले. यासाठी मंगळवारीग्रामसभा घेण्यात आली, यात कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्यानंतर काम पुन्हा सुरु करण्यात आले.
हेही वाचा... माझी मेट्रो नागपूर : 'मला श्रेय नको तर, जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे'
नागपूर ते मुंबई या प्रस्तावीत महामार्गाचे काम सध्या सुरु आहे. मात्र ते करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम करताना मालवाहतूक गाड्यांची ये-जा होते, यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळ निर्माण होत आहे. याचा विपरीत परिणाम शेतीवर होतो. याच कारणांमुळे संतप्त झालेल्या कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गावातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले होते. रस्त्यावर पाणी न मारल्याने पिकावर धूळ बसत आहे. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या मोठमोठ्या गाड्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या गोदावरी नदीपासून आणलेल्या सिंचनासाठीच्या पाईपलाईन फुटलेल्या आहेत. तेव्हा अशा अनेक समस्यांमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले. त्यानंतर मंगळवारी कोकमठाण गावात कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत, जो पर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही. तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.