अहमदनगर- लॉकडाऊन नंतर आता सर्वच रस्ते खुले केले जात आहे. मात्र, शिर्डीतील साई मंदिर देवस्थान हे भक्तांसाठी खुले करण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे तर, द्वारकामाईकडील रस्ता प्रशासनाने बॅरिकेड लावून बंद केल्याने बाहेरून साईच्या मंदिरातील पवित्र वास्तुंचे दर्शन घेने देखील अशक्य झाले आहे. त्यामुळे, हा रस्ता खुला करण्याची मागणी साईभक्तांकडून करण्यात येत आहे. रस्ता खुला न केल्यास आंदोलन करण्याचा इशार भक्तांनी दिला आहे.
लॉकडाऊनमुळे साईबाबा मंदिर आणि परिसरातील व्दारकामाई, चावडी, मारुती मंदिर ही ठिकाणे भाविकांसाठी १७ मार्चपासून बंद करण्यात आली आहेत. मात्र, आता अनलॉक सुरू झाल्या नंतर मॉल्समध्ये प्रवेश मिळत आहे, तसेच दारूची दुकाने देखील सुरू करण्यात आली आहेत. मात्र, धार्मिक स्थळे अद्याप बंद ठेवण्यात आली आहेत. साई मंदिरातही दिवसाला ५ ते ६ हजार ग्रामस्थांना दर्शन करता येईल, असा प्लान संस्थने केला होता. मात्र, शासनाचे आदेश नसल्याने मंदिर उघडले नाही. मंदिरात द्वारकामाईकडील रस्ता खुला करावा, तसेच लांबूनच दर्शन घेवू द्यावे यासाठी विजय कोते यांनी साई संस्थानाला निवेदन दिले होते. मात्र, अजूनही रस्ता संस्थानकडून खुला करण्यात आलेला नाही. रस्ता खुला न केल्यास कोते यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.