अहमदनगर -नगर जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यात नेहमीच विळ्या भोपळ्याचे नाते राहिलय. आधी कॉग्रेस पक्षात असताना आणि आता वेगवेगळ्या पक्षात असतानाही. विखे-थोरात एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या कॉग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना कोणीही विचारत नसून ते लाचारासारखे सत्तेत कसे सहभागी आहेत. याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत असून, प्रदेशाध्यक्षांना कोणी विचारत नाही, अशी टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात आणि कॉग्रेसवर केली आहे.
सख्खे शेजारी पण पक्के राजकीय वैरी; विखें-थोरातांमध्ये पुन्हा संघर्ष
सत्तेसाठी एवढे लाचार प्रदेशाध्यक्ष प्रथमच पाहतोय
राधाकृष्ण विखे यांनी शिडीर्तील विविध समस्या आणि व्यावसायिकांच्या अडचणी संदर्भात बैठक घेतली त्यानंतर सध्याच्या सरकारमधील काँग्रेस आणि शिवसेनेच्या संदर्भात विचारले असता त्यांनी कॉग्रेस पक्षावर आणि प्रदेशाध्यक्षांवर टिका केली. मी असे सत्तेसाठी लाचार प्रदेशाध्यक्ष कधीच पाहिले नाही.अग्रलेख लिहण्याची का वाट पाहावी आपल्या मनात जर स्वाभिमान शिल्लक असेल तर सत्ता सोडून बाहेर यावे. सरकारमधे सहभागी असेलल्या कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना कोणीही विचारत नाही त्यामुळे ते नाराज असतील तर सत्तेत का आहेत. याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत आहे असे विखे म्हणाले.
सतत पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये
राजकीय संघर्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या या नेत्यांची जुगलबंदीत थोरात मागे कसे राहतील. त्यांनीही संगमनेरमध्ये विखेंना प्रत्युत्तर दिलंय. 'ते काॅंग्रेसमध्ये असताना व विरोधी पक्षनेते असताना त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना आम्ही पाहिले आहे. अशा व्यक्तीने माझ्यावर टीका करू नये, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे. सतत पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असे थोरात म्हणाले. सख्खे शेजारी- थोरात-विखेंचा संगमनेर-राहाता मतदारसंघ शेजारी-शेजारी आहे. थोरातांचे गाव जोर्वे आणि विखेंचे गाव लोणीसुद्धा अवघ्या काही किलोमीटर. अनेक वर्षे हे दोघे नेते कांग्रेस पक्षात असले तरी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात त्यांचे सूत कधीच जुळले नाही. दिवंगत बाळासाहेब विखें असोत वा आता राधाकृष्ण विखे असोत, तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात या दोघांनीही स्वतःचा स्वतंत्र गट ठेवून एकमेकांना शह देण्याचे काम केले. विशेष म्हणजे या दोघांनाही कांग्रेस पक्षाने भरपूर काही दिले. विखे मंत्रीही राहिले आणि 2014 ला विरोधीपक्ष नेते झाले. दुसरीकडे थोरात दिल्ली दरबारी काँग्रेस कमिटीचे सदस्य होऊन गांधी घराण्याच्या जवळ पोहोचले. मात्र, 2019 ला सुजय विखेंच्या खासदारकीच्या मुद्यावरून पवार-विखे संघर्ष राज्यात गाजला आणि विखे परिवार भाजपमध्ये दाखल झाला. यामुळे आता विखे-थोरातांचा पक्षांतर्गत संघर्ष उघडपणे जोर धरत आहे.
राधाकृष्ण विखे आता फक्त आमदार आहेत तर थोरातांकडे मंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपद आणि काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीचे सदस्यपदही आहे. मात्र, या परिस्थितीत विखे हे थोरातांना कैचीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. महाआघाडीवर टीका करण्यापेक्षा थोरातांना कुठे पकडता येईल याची संधी ते शोधत असतात. अशात महाआघाडी काँग्रेस नेत्यांना विचारत घेत जात नसल्याची तक्रार थोरातांनी करताच विखेंनी बोचरी टीका केली. तर आता थोरतांनीही त्यांच्यावर बोचरी टीका करून उत्तर दिले आहे. ही राजकीय जुगलबंदी पुढेही सुरूच राहणार अशीच चिन्हे सध्यातरी आहे.