दूध दराच्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघाची एकत्रिपणे बैठक घेणार -विखे पाटील - सहकारी आणि खासगी दूध संघाची एकत्रिपणे बैठक
दूध दरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघाची एकत्रिपणे बैठक घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दूध उत्पादक शेतक-यांना आपण वा-यावर सोडणार नाही अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शिर्डी - लम्पी आजारात राज्यातील सर्व पशुधनाचे मोफत लसिकरण करणारे देशातील महाराष्ट्र राज्य हे एकमेव आहे. शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. दूध दरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघाची एकत्रिपणे बैठक घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दूध उत्पादक शेतक-यांना आपण वा-यावर सोडणार नाही अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत मंत्री विखे पाटील यांनी आज कनकुरी, नादुर्खी खुर्द आणि बुद्रूक या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन योजनांची माहीती देवून नागरीकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तातडीने उपाय योजना करण्याच्या सुचना त्यांनी विविध विभागांच्या आधिका-यांना दिल्या. याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, या उपक्रमाअंतर्गत आज दूध उत्पादक शेतक-यांनीही आपली भेट घेवून दर कमी झाल्याच्या संदर्भात आपली चर्चा झाली आहे. याबाबत राज्य सरकार गंभीर असून, दूध उत्पादक शेतक-यांवर कोणताही अन्याय होणार नाही यासाठी लवकरच सहकारी आणि खासगी दूध संघ तसेच पशुखाद्याचे उत्पादन करणा-या कंपन्या यांची एकत्रितपणे बैठक घेवून निर्णय करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभेअसल्याचे स्पष्ट करुन, मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, राज्यात लम्पी संकट मोठ्या प्रमाणात आले असताना जनावरांचे मोफत लसिकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्यांची जनावरे दगावली त्यांनाही आर्थिक मदत राज्य सरकारने केली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्याने सर्वच समाजातील घटकांच्या हिताचे निर्णय होत आहेत. शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासनाच्या निर्णयांचा लाभ सामान्य माणसाला होत आहे की नाही याचाही आढावा घेतला जात असून, गावातील समस्या सुटण्यासाठीही हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.
शिर्डी आणि परिसरातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हाच आपला प्रयत्न असून, येणा-या काळात शेती महामंडळाच्या जमीनींचा विनीयोग औद्योगिक कंपन्या उभारण्यासाठी करण्यात येणार असून, याबाबतचे नियोजन आता सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश कारखाना निवडणुकीसंदर्भात भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, कारखान्याबद्दल यांना एवढी आपुलकी होती तर आठ वर्षांपूर्वीच चालविण्यास का घेतला नाही? आजही सर्व दु:खीत एकत्रित आले आहेत. परंतु कारखाना कोण चालविणार हे सांगायला ते तयार नाहीत. यापूर्वीसुध्दा कोणतातरी पॅटर्न त्यांनी आणला होता. यामध्ये कामगारांना पगार कमी दिले. ऊस उत्पादक सभासदांचे आर्थिक नुकसान केले. त्यामुळे आलेल्या पाहुण्यारावळ्यांना फक्त राजकारण करायचे आहे. गणेश कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी राज्य सरकारची मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.