अहमदनगर - शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदातसंघाच्या भाजप आमदार मोनिका राजळे या निष्क्रिय आहेत. कोरोनाच्या संकटकाळात त्या जनतेच्या प्रश्नांकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप करत मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राजळे यांच्या मूळगावी कासार पिंपळगाव येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनास मज्जाव करत आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.
गेल्या सहा वर्षांपासून आमदार राजळे या जनतेचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, त्यांचा प्रशासनावर वचक नाही, तसेच त्या सामान्य जनतेसाठी नव्हे ठेकेदार यांच्याशी हितसंबंध ठेवून आहेत, असा आरोप यावेळी वंचितचे प्रा.किसन चव्हाण यांनी केला. यावेळी आमदार राजळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन तक्रारी सोडवल्या जातील असे आश्वासन दिले.