महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरच्या बळीराजावर अवेळी पावसाचे संकट, कांदा पिकावर फिरवला रोटाव्हेटर - Ahmednagar Rain News

शिर्डी, संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतात सडलेल्या कांद्यावर शेतकऱ्यानी उभ्या पिकात ट्रॅक्टर रोटव्हेटर फिरवल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले.

अहमदनगरच्या बळीराजावर अवेळी पावसाचे संकट

By

Published : Nov 18, 2019, 4:37 PM IST

अहमदनगर -शिर्डी, संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या अतिपावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात कांदा सोडल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे उभ्या पिकात ट्रॅक्टर रोटाव्हेटर फिरवत असल्याचे विदारक चित्र परिसरात दिसत आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे सरकारने पंचनामे केले आहेत. मात्र, मदत कधी मिळणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अहमदनगरच्या बळीराजावर अवेळी पावसाचे संकट

यंदा उशिरा पाऊस झाल्याने अनेकांनी पाऊस नसल्याने सुरवातीला पेरण्याच केल्या नव्हत्या. नंतर पाऊस पडेल या आशेने काहींनी पावसाच्या आशेवर कांदा हे नगदी पीक घेतले होते. पाऊस पडल्याने यंदा उत्पन्न चांगले होईल अशी शेतकऱ्याला आशा होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सलग पावसामुळे शेतात पंधरा ते वीस दिवस पाणी साठुन राहिल्याने कांदा जमिनीतच सडून गेला. शेतकऱ्याच्या खिशाला आधार देणारे कांदा हे नगदी पीक पठार भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरवर्षी प्रत्येक हंगामात परिसरातून जवळपास तीनशे ते चारशे हेक्टर कांदा पीक घेतले जाते. मात्र, मागील तीन वर्षांपासून सलग दुष्काळ पडल्याने उत्पन्न घटत चालले आहे. शेती करणे अवघड झाले आहे, तर ऑक्टोबर महिन्यात सलगपणे झालेल्या जोरदार पावसाने कसेतरी जगलेले पीक शेतातच सडून गेले. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसला आहे. उभ्या पिकात नांगर घालण्याशिवाय पर्याय नसल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

या वर्षी कांद्यास चांगला दर मिळत असूनही कांदा शेतातच सडल्याने शेतकऱ्यातून चिंता व्यक्त होत आहे. खरीप हंगामात पदरी काहीही पडले नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी कशी करायची? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. उधारी, उसनवारीने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. डोक्यावर कर्जाचे ओझे वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतात कांदा सडल्याने परिसरातील शेतकरी उभ्या पिकात ट्रॅक्टर रोटाव्हेटर फिरवत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. परिसरातील नुकसानीचे शासनाने पंचनामे केले आहेत. मात्र, मदत कधी मिळणार? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details