अहमदनगर - अकोले आणि संगमनेर भागातील सुमारे पाच हजार एकर क्षेत्रातील टोमॅटो पिकाला विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. अकोले तालुक्यात निळवंडे धरण ते आश्वीपर्यंतच्या प्रवरा नदीकाठावरील दोन्ही बाजूच्या गावांमधील टोमॅटो पिकावर या अनोळखी रोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. एकट्या संगमनेर तालुक्यात सुमारे साडेतीनशेहून अधिक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना या अनोळखी रोगाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
टोमॅटोवरील अनोळखी रोगाने अहमदनगरमधील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान... हेही वाचा...कुठे कांदा नासतोय तर काही भागात पपईच्या बागा उद्ध्वस्त.. शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं ?
कंपनीच्या बोगस बियाणामुळे शेतकरी देशोधडीला लागायची वेळ आली आहे...
'लालबुंद आणि परिपक्व झालेले टोमॅटोला नवीनच विषाणूची बाधा झाली आहे. टोमॅटोचा रंग आणि आकार बदलत आहे. यात टोमॅटोला खड्डा पडून आतमध्ये फळ काळे पडून सडू लागले आहे. तसेच टोमॅटोवर पिवळे चट्टे देखील पडत आहे. या नव्या आणि अनोळखी रोगाने सगळी टोमॅटो शेती धोक्यात आली आहे. औषध फवारणी करुन देखील रोग अटोक्यात येत नाही. शेतातील 40 ते 50 टक्के पीक खराब होत असल्याने फेकून द्यावे लागत आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे कंपनीच्या बोगस बियाणांमुळे पिकावर पडलेला रोग, या दुहेरी संकटामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे' अशी उद्विग्न प्रतिक्रिया संगमनेरच्या कोटे बुद्रुक येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी राजू वाकळे यांनी दिली.
कृषी विभागाने या विषाणूजन्य रोगाचा शोध घ्यावा : अजित नवले
'फेब्रुवारी आणि एप्रिल दरम्यान शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. उन्हाळ्यात या पिकाची जोपासना करताना शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तसेच या पिकासाठी एकरी एक ते दोन लाख रुपयापर्यंत खर्च केला जातो. त्यानंतर मे ते जून महिन्यात या पिकाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे परिसरातील शेतकरी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. यावर्षी शेतकऱ्यांनी केलेल्या लागवडीला चांगले टोमॅटो लागले आहेत. मात्र, हे फळ पक्व होण्याच्या अवस्थेत असताना पिवळे पडू लागले आहे. काहीवेळी हळूहळू रंग पांढरा होऊ लागतो आहे. काही फळे वेडीवाकडी आकार धारण करत असून त्यांवर काळसर ठिपके पडत आहे. असे फळ कापल्यानंतर ते आत काळसर दिसू लागते. अवघ्या एका दिवसात ही सर्व फळे सडायला लागतात. टोमॅटोवरील या नवीन विषाणुजन्य रोगामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहे. तालुका कृषी विभागाने या प्रकरणात लक्ष घालत, हा रोग नेमका कोणता आहे ते शोधावे. तसेच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वितरीत केलेल्या बियानामध्ये काही दोष होता का, हे शोधावे' अशी मागणी किसानसभेचे नेते अजित नवले यांनी केली आहे.
हेही वाचा...'जगण्यासाठी शहरात आलो; जिवंत राहण्यासाठी गाव गाठले', मजुरांची 600 किमीची पायपीट
महात्मा फुले कृषी विद्यापीठचे शास्त्रज्ञ या परिसरातील टोमॅटोचे नमुने गोळा करत आहेत. काही नमुने तपासणीसाठी बंगळूर येथे पाठवण्यात येणार आहे, असे संगनमेर तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी सांगितले आहे. संगमनेर परिसरातील टोमॅटो पिकावरील रोगाचे नाव अद्याप समजलेले नाही. मात्र, शेतकरी या रोगाला तिरंगा असे संबोधित आहेत.