शिर्डी - मध्यप्रदेश राज्यातील असलेले अहीरराव कुटुंब गेल्या काही दिवसांपासुन साईबाबा संस्थानच्या बांधकाम प्रकल्पावर ठेकेदाराकडे काम करत आहेत. या कुटुंबातील साठ वर्षीय नथुराम दलवा अहीरराव यांना दोन तीन दिवसापुर्वी त्रास होत असल्याने साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची कोवीड टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांना संस्थानच्या कोवीड रूग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र ते आपल्या नातेवाईकाकडे जाण्याचा हट्ट धरत होते. आज सकाळी त्यांची सुन जेवण घेवून गेली असता डॉक्टरांनी डिस्चार्ज घ्यायला सांगितले. त्यानुसार डिसचार्ज घेवून बाहेर आल्यावर त्यांचा मृत्यू झाला असे मयताचा नातू देसराम यांनी सांगितले आहे.
रूग्णाला नाईलाजास्तव डिस्चार्ज दिला-
साई संस्थानच्या कोवीड रूग्णालयात हा रूग्ण उपचार घेत होता. नातेवाईकांनी त्याला डिस्चार्ज देण्याचा आग्रह धरल्याने सेंटरवरील डॉक्टरांनी या रूग्णाला नाईलाजास्तव डिस्चार्ज दिला. यानंतर ते येथून बाहेर पडल्यानंतर रस्त्याने जातांना या रूग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असल्याची माहिती साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ मैथिली पिंताबरे यांनी दिली आहे.