अहमदनगरSharad Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिर्डीतील पक्षाच्या चिंतन शिबिरात मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केलीय. भाजपा 450 जागा जिंकेल असं सांगत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली तसंच पंजाबमध्ये भाजपाचं सरकार नाही. मात्र तरी ते 450 जागेवर दावा करता आहेत. गोवा, मध्य प्रदेशातील सरकार भाजपानं पाडलंय. मग भाजपाचे सदस्य 415 कोणत्या आधारावर निवडून येणार, याबाबत बोलत नाही. यावरून असं दिसतंय की, आज देशात भाजपासाठी अनुकूल चित्र नाही.
हिटलरच्या प्रचार यंत्रणेप्रमाणे भाजपाचं काम : शिर्डीत राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर होतं. या शिबिराच्या शेवटी शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते अस्वस्थ होते. त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का व्हावा, यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील चित्र वेगळं आहे. भाजपा सत्तेत आहे. त्यामुळं त्यांनी आक्रमक प्रचार यंत्रणा उभी केली आहे. जर्मनीत हिटलरच्या प्रचार यंत्रणेप्रमाणे भाजपा काम करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय.
भाजपाचं आश्वासन हवेत : भाजपानं सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासनं दिली होती. नरेंद्र मोदी क्वचितच संसदेत येतात. 2016 ते 2017 चा अर्थसंकल्प सादर करताना 2022-23 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, असं सांगण्यात आलं होतं. आज 2024 आहे, मात्र तरीदेखील उत्पन्नात दुप्पट वाढ झालेली नाही. 2022 पर्यंत शहरी भागात पक्की घरं देऊ असं भाजपा सांगत होता, पण ते आश्वासन हवेत विरलंय, असं शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्याची अवस्था चिंताजनक :काही तरुण हातात गॅसच्या कांड्या घेऊन संसदेत घुसले. तेव्हा प्रश्न विचारल्यानं 146 खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आलं, बेरोजगारी, महागाई सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत. गॅसचा दर 1100 रुपये झाला आहे. अन्नधान्य महाग झालं आहे. आम्ही आता लोकसंख्येच्या बाबतीत 140 कोटींचा आकडा पार केला आहे. यातील 54 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. लोकसंख्येचा दबाव वाढत आहे. शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक बनली आहे. शेतकऱ्यांवरील बोजा कमी करण्यासाठी धोरणं आखण्याची गरज आहे, असं पवार यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- रश्मी शुक्लांचं कमबॅक; अखेर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
- फक्त साडेचार हजार कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा दिलासा, राज्य शासनाचा निर्णय
- भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, पण कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही- जितेंद्र आव्हाड