शिर्डी (अहमदनगर) -कोरोनाच्या प्रादुर्भाव सुरु होताच केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली. मात्र, त्याचे पैसे ग्राहकाने आधी द्यायचे होते आणि नंतर ते पुन्हा त्यांना सरकारकडुन परत मिळणार होते. त्यातच आता गेल्या एक महिन्यापासून अनुदानित गॅस सिलेंडरचे मिळणारे अनुदान ग्राहकांना मिळणे बंद झाले आहे. तर याबाबत ग्राहकांनी गॅस एजन्सीकडे विचारणा केली असता तुम्हाला रक्कम सरकारकडुन मिळेल, आम्ही काही करु शकत नाही, या शब्दात उत्तर दिले आहे. तसेच अनुदानाबाबत ते ग्राहकांना कोणतीही मदत करु शकत नाही, असे स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या या महासंकटामुळे नागरिकांना आर्थिक संकट सोसावे लागले आहे. ग्राहकांना मार्च महिन्यात 798 रुपयांना गॅस सिलेंडर मिळत होते. लाभार्थ्यांना एप्रिलपर्यंत अनुदान मिळाले. मात्र, त्यानंतर मे महिन्यापासुन गॅस टाकीची किंमत ही 598 रुपये झाली. गॅस सिलेंडर भरल्यानंतर परत मिळणारे काही पैसे पुन्हा संसाराचा गाडा हाकण्यासाठी कामात येतील, अशी आशा या लाभार्थ्यांना होती. मात्र, शासनाकडून त्यांना मे महिन्यापासून अजूनही अनुदान न मिळाल्यामुळे ते आणखी आर्थिक संकटात सापडले आहे. त्यानंतर पुढे अनुदान मिळेल की नाही? या बाबतही स्पष्ट माहिती आलेली नाही. तर अनुदान मिळत नसल्याने या बाबतची विचारणा कोणाकडे करावी? असा प्रश्न या लाभार्थ्यांना पडला आहे.