अहमदनगर - मुख्यमंत्री कोण होणार याच्याशी काही देणं घेणं नाही, ते वेळ आल्यावर बघू, एक दोन निवडणुका जिंकल्याने हुरळून जाण्याची गरज नाही. सध्या राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीरामपूर येथे शेतकरी मेळाव्यात केले. त्यांच्या या वक्तव्याने आगामी मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेल्या तर्कवितर्कांवर पडदा पडण्याची शक्यता आहे.
येथील मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या हस्ते काही शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले. काही शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भाषणामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, मत मागून गायब होणारे आम्ही नाही. युती करताना कर्जमाफी झाली पाहिजे ही माझी पहिली अट होती. सरकार आपले असले तरी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचतात का? हे पाहण्यासाठी मी आलो आहे. येथील खासदार सदाशिव लोखंडे यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले की, एकवेळ दिल्लीला जाऊ नका पण, शेतकऱ्यांकडे अगोदर जा. शेतकरी किती दिवस श्रद्धा आणी सबुरी ठेवणार, कधीतरी शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो. शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या सोबत आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, अन्नदाता आपला गुलाम नाही. बळी हा राजा आहे त्याचा बळी देण्यासाठी नाही. पिक विमा कंपन्या पळून जाऊ शकत नाहीत, शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळवून देणारच. शेतकरी संप करू शकतो, हे पुणतांबे गावाने दाखवून दिल्याची त्यांनी आठवण करून दिली.
राम मंदिराचा मुद्दा