अहमदनगर :नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील काष्टी शिवारात आज सकाळच्या सुमारास उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून आलेल्या टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघातात सिंदखेडा जिल्हा धुळे येथील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून १ पुरुष गंभीर जखमी आहे. टेम्पोतील इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांची ओळख पटली नसून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
सिंदखेडा येथील ऊस तोडणी कामगार सांगली जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गेले होते. ऊस हंगाम संपल्याने ते सांगली येथून (एमपी ०९ जीएन ३८८८) या टेम्पोतून साहित्य घेऊन गावी निघाले होते. आज सकाळच्या सुमारास टेम्पो काष्टी शिवारातील राहिंजवाडी येथे आला असता रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या टेम्पोला (एम.एच १६ एवाय ९७७५) पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत टेम्पोत बसलेल्या २० प्रवाशांपैकी २ महिला प्रवाशांना जास्त मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे. इतर प्रवासी किरकोळ जखमी आहेत.