शिर्डी (अहमदनगर) - दोन व्यक्तींचे मृतदेह रस्त्याच्याकडेला आढळल्याने खळबळ उडाली आहे. मागील दोन दिवसांपासून शिर्डीत कोसळत असलेला पाऊस आणि जाणवत असलेल्या थंडीमुळे या दोन्ही व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून दुसऱ्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत.
शिर्डीतील नगर-मनमाड महामार्गावर एक आणि कणकुरी रोडवर लागत असलेल्या ओढ्याजवळ एक अशा दोन ठिकाणी दोन व्यक्तीचे मृतदेह आढळल्याची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतले. एका मृतदेहाजवळ काही आधार कार्ड व दवाखान्याची काही कागदपत्रे आढळली असून त्यावरून एकनाथ हाटे (रा. कल्याण), अशी एकाची ओळख पटली आहे.