अहमदनगर-लष्कराच्या हद्दीमध्ये बीटीआर (बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट) परिसरात बनावट ओळखपत्र दाखवून दोन तरुणांनी लष्कराच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र बीटीआरच्या जवानांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी या संशयित युवकांना ताब्यात घेत भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तुषार पाटील (22) आणि सोपान पाटील(24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
बनावट ओळखपत्र दाखवून लष्कराच्या हद्दीत घुसण्याऱ्या दोन तरुणांना अटक - ahmednagar army camp news
बनावट ओळखपत्र दाखवून लष्कराच्या हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरूणांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.
हे दोघे तरुण दुचाकीवर बीटीआर मध्ये जात होते. प्रवेशद्वारावरील जवानांनी त्यांना अडवून दोघांकडे चौकशी केली असता, त्या दोघांनी लष्कराचे एक ओळखपत्र दाखवले; परंतु त्यांनी दाखवलेल्या ओळखपत्राबाबत अधिक माहिती घेतली असता, दोघांनी दाखविण्यात आलेले ओळखपत्र बनावट असल्याचे उघड झाले. या दोघा तरुणांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देवून या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना आज न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अहमदनगर महत्वाचे लष्करी केंद्र
अहमदनगर शहराच्या सर्व बाजूंनी लष्कराची महत्वाची केंद्र आहेत. बीटीआर, एसीसी एन एस, एमआयआरसी आदी विभाग इथे आहेत. लष्करात भर्ती झाल्यानंतर प्रशिक्षणापासून विविध रंगागाड्यांवर युद्धाचे प्रशिक्षण देणे, विविध क्षेपणास्त्र यांची चाचणी, दोस्त राष्ट्रांसोबत युद्ध सराव, लष्करी वाहनांचे परीक्षण आदी वेगवेगळ्या विभागात घेतले जाते. त्यासाठी मोठे क्षेत्र हे लष्करासाठी राखीव आणि प्रतिबंधित आहे. अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी यावर देखरेख ठेवून असतात. अतिवरीष्ठ अधिकारी यानिमित्ताने या लष्करी विभागांना नियमित भेट देत असल्याने हे सर्व क्षेत्र लष्करी दृष्टीकोनातून संवेदनशील आणि सामान्य जनतेसाठी प्रतिबंधित आहे. या परिस्थितीत या दोन तरुणांनी कोणत्या कारणास्तव या हद्दीत जाण्याचा प्रयत्न केला याचा शोध पोलीस घेत आहेत.