अहमदनगर - कोपरगाव शहरातील मुर्शदपूर शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. जेठालाल जग्गुलाल भिल (वय 34 वर्षे) व त्यांची पत्नी शांती जेठालाल भिल (वय 30 वर्षे, दोघे रा. मोखमपुरा ता. आशिंद, जिल्हा भिलवाडा, राजस्थान ), असे पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर शिवारातील गणेश कारभारी राहाणे यांच्या शेतात 105 फुटावर विहिरीचे खोदकाम सुरू होते. रविवारी (दि. 24 एप्रिल ) सकाळी 10 वाजेच्या सुमारास मजुरांनी काम करण्यास सुरुवात केली. विहिरीत खोदकाम करण्यासाठी भिल दाम्पत्य क्रेनच्या माडीमध्ये उभे राहून विहिरीत उतरत होते. त्यावेळी अचानक क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने माडी वेगाने खाली 105 फूट खोल विहिरीत दगडावर आदळली व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले आहे.