अहमदनगर - लोकसभेच्या नगर दक्षिणच्या जागेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. आज (गुरुवार) पहिल्या दिवशी २१ उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. ४ एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले असून, उमेदवारांना याठिकाणी आवश्यक ती माहिती दिली जात आहे. जिल्हाधिकरी राहुल द्विवेदी यांनी या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून, तीनपेक्षा अधिक वाहने आणि चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव असणार आहे. आज वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड, मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक संजीव भोर, संभाजी गायकवाड यांनीही अर्ज नेले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे रस्ते आजपासून बंद करण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी निवडणूक विभाग पोलिसांच्या मदतीने सतर्क असल्याचे चित्र दिसत आहे. ४ एप्रिलपर्यंत सुट्या सोडून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. ५ एप्रिलला अर्जाची छाननी होणार असून, ८ एप्रिलपर्यंत अर्ज माघारीची मुदत असणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होईल.