अहमदनगर - इंदोरीकर महाराजांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या दालनात कोंडून अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिला. इंदोरीकरांवर तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे केली.
इंदोरीकर महाराज वेळोवेळी महिलांचा आपल्या कीर्तनातून अपमान करतात. याशिवाय त्यांच्या समर्थकांनी माझ्यावर खालच्या पातळीवर समाजमाध्यमात, फोनवर टीका-टिप्पणी केली आहे. यासाठीही त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देसाई यांनी केली. पीसीपीएनडीटी कायद्यानुसार लवकर कारवाई केली नाही, तर इंदोरीकर यांना अकोलेत जाऊन काळे फासू, असा इशाराही त्यांनी दिला.