अहमदनगर -जिल्ह्यातील श्रीरामपूर ते नेवासा रस्त्यावर देशी दारू घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकचा थरार नागरिकांना पाहायला मिळाला. हा ट्रक कोपरगावहून नांदेडच्या दिशेने जात होता. मात्र, या ट्रकचा नेवासा पोलीस आणि पत्रकारांनी थरारक पाठलाग करून शेवगावमध्ये तो रोखला. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागरिकांनी अनुभवला श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर बेदरकार ट्रकचालकाचा थरार - Nevasa road crime news
सिनेमात शोभेल असा थरार मंगळवारी रात्री नेवासा आणि शेवगावकरांना पाहायला मिळाला. पोलिसांच्या 10 मोटार सायकल, 3 जीप पन्नासहून अधिक नागरिक, पत्रकारांनी ट्रकचा पाठलाग केला. मात्र, बेदरकार चालकाने सर्व अडथळे तोडून ट्रक शेवगावच्या दिशेने गेला.

सिनेमात शोभेल असा थरार मंगळवारी रात्री नेवासा आणि शेवगावकरांना पाहायला मिळाला. पोलिसांच्या 10 मोटार सायकल, 3 जीप, पन्नासहून अधिक नागरिक, पत्रकारांनी ट्रकचा पाठलाग केला. शेवगावच्या दिशेने येताना भेंडा कुकाणा येथे रस्त्यावर हातगाडी लावत पोलिसांनी ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने ट्रकचा वेग न आवरता सर्व अडथळे तोडून शेवगावच्या दिशेने गेला.
या प्रकारानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर शेवगाव बस स्टॅण्डजवळ जिल्हा बँकेसमोर ब्रॅकेटिंग लावण्यात आले. मात्र, तरीही ट्रकचालकाने हे अडथळे सुद्धा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण नंतर ट्रक वळवता न आल्याने तो शेवगाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराशेजारील दुकानांमध्ये घुसला. यामध्ये दुकानांचे आणि ट्रकच्या पुढील भागाचे नुकसान झाले. या अपघातात ट्रकचालक जखमी झाला. चालकास शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.