शिर्डी (अहमदनगर) -कोपरगाव सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक घुसला. यात कर्तव्यावर असलेले शिक्षक सुनिल डुकरे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सीमाभागात ग्रामीण पोलिसांनी चेकपोस्ट उभारले आहेत. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. सद्या अपुऱ्या पोलिसांच्या मनुष्यबळामुळे काही शिक्षकांना या ठिकाणी ड्युटी देण्यात आली आहे. शिक्षक सुनिल डुकरे हे पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर पोलिसांसह कर्तव्यावर होते.
तेव्हा नाशिकहून ऑक्सिजन गॅसचे सिलेंडर घेऊन निघालेला ट्रक (क्र. एमएच 17 टी 2835) चेकपोस्टजवळ उभारण्यात आलेल्या तंबूत ट्रक घुसला. यात शिक्षक सुनिल डुकरे जखमी झाले. तंबूच्या शेजारी उभी असलेली अॅक्टिव्हा गाडी ट्रकच्या धडकेने चक्काचूर झाली. दरम्यान, चालकाचे वाहनावरिल नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे कळते.