अहमदनगर- नगर शहरातील तहसील कार्यालय परिसरात काही जुने वृक्ष परवानगी न घेता तोडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे वृक्ष याच आवारात असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून तोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत काही वृक्षप्रेमींनी तक्रार केल्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेने पंचनामा केला आहे. तसेच, तोडलेल्या झाडांची अगोदरच परस्पर विल्हेवाट लावल्याचेही पुढे आले आहे.
शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या प्रशस्त जागेमध्ये विविध शासकीय कार्यालय आहेत. या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुनी झाडे आहेत. या झाडांना हात न लावता या ठिकाणी मध्यवर्ती शासकीय इमारतीचे निर्माण करण्यात आले. या इमारतीत अनेक शासकीय कार्यालये आहेत. या परिसरामधील जुनी झाडे तोडण्याचा निर्णय सामाजिक वनीकरण विभागातील काही कर्मचाऱ्यांनी घेतला आणि त्या अनुषंगाने तीन जुनी वृक्षे तोडण्यात आली. मात्र, यासाठी आवश्यक असलेली परवानगी घेतली नसल्याचे समजले आहे. जुनी झाडे तोडण्यात येत असल्याचे वृक्षप्रेमींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतरच हा प्रकार समोर आला.