शिर्डी- आपला एक सुंदर बंगला असावा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी प्रत्येकजण पै, पै जोडत असतो. त्यात तृतीयपंथी म्हटल की त्यांच्यासमोर पर्याय असतो तो टाळ्या वाजवत पैसे मिळवण्याचा. मात्र, हे करत असतानाच आपल्या पुढच्या पिढीला हक्काचा निवारा मिळावा यासाठी जिल्ह्यातील श्रीरामपुरात जमवलेल्या पैशातून ५० लाख रुपये खर्चून घर बांधण्यात आले आहे.
येणाऱ्या पिढ्यांसाठी तृतीयपंथींनी श्रीरामपुरात उभारले हक्काचे आश्रम तृतीयपंथीयांबद्दल नेहमीच समाजातील इतर लोकांच्या मनात एक नावडती भावना राहिलेली आहे. तृतीयपंथी वर्गाला जाणून वाळीत टाकल्यासारखे लोक वागवतात. मात्र, आता काही तृतीयपंथी उच्चशिक्षित असून देखील त्यांना कामावर ठेवले जात नाही. परिणामी लोकांपुढे हात पसरून भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर येते. आपल्या आसपास नेहमीच आपल्याला या वर्गाचे दर्शन होत असते.
जिल्ह्यातील श्रीरामपुरात तृतीयपंथी समाजाचे गेल्या अनेक पिढ्यांपासून वास्तव्य आहे. शहरातील काँग्रेस भवनच्यामागे त्यांची जमीन आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून ते येथे राहतात. या समाजातील लोकांना एक हक्काचे घर असावे असे मनात घेवून श्रीरामुरातील तृतीयपंथीयांच्या पुढाकाराने राहण्यासाठी आश्रम बांधण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सुमारे शंभरच्यावर तृतीयपंथीयांनी आपल्यापरीने कमाईतील काही हिस्सा या आश्रमाच्या बांधकामासाठी दिला आहे. तसेच समाजातील दानशुर व्यक्तींनीही मदत केल्याने २ हजार ७०० स्केअर फुटांचे बांधकाम करण्यात आले आहे. या आश्रमात सध्या २२ तृतीयपंथी राहतात. त्या समाजातील सर्वच धर्मातील असल्याने या आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळच दर्गा आणि साईमंदीरही बनवण्यात आले आहे.
या वास्तुंचा गृहप्रवेश करण्यात आला आहे. यावेळी समाजातील सर्वच स्तरातील व्यक्तींना स्नेहभोजणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. एका घरातील अथवा आणि एका समाजातील लोक आज एकत्र राहत नसताना आजची आपली पिढी आणि उद्याची पिढी सुरक्षित रहावी यासाठी तृतीयपंथींनी येवून उभारलेले हे भवन नक्कीच प्रेरणादायी आहे.