अहमदनगर- आज प्रजासत्ताकदिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढलेली असताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीतही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. राळेगणसिद्धी ते पारनेर तहसील कार्यालय ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. अण्णांनी हिरवा झेंडा दाखवत या रॅलीची सुरुवात झाली.
तिरंगा झेंडा हातात घेत नागरिकांचा सहभाग -
दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहे. या निमित्ताने आज प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. याला समर्थन देण्याकरिता ही रॅली काढण्यात आली असल्याचे अण्णांनी यावेळी सांगितले. यावेळी राळेगणसिद्धी असंख्य शेतकरी या रॅलीत तिरंगा झेंडा हातात घेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
अश्रुधुर आणि लाठीचार्जचा वापर -
दरम्यान, दिल्लीमध्ये आज केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. ठिकठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडत दिल्लीमध्ये प्रवेश केला. तर, पोलिसांनी या आंदोलकांना अडवण्यासाठी अश्रुधुर आणि लाठीचार्जचा वापर केला. दिल्लीमध्ये विविध ठिकाणी सुरू असलेल्या या हिंसाचारात कित्येक आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले. तसेच, पोलिसांनी बॅरिकेट्स म्हणून वापरलेल्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हेही वाचा - मराठा आरक्षण, भरतीमध्ये काही तांत्रिक अडचणी, मात्र आम्ही मार्ग काढू - बाळासाहेब थोरात