अहमदनगर - राहुरी येथील महसूल प्रशासनाच्या नाकावर टिंचून वाळू तस्करांनी तहसील कार्यालयाच्या आवारातूनच महसूल विभागाने जप्त केलेला वाळूचा डंपर आणि ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत २ वाळू तस्करांवर राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
वाळू तस्करांनी तहसील कार्यालयातील जप्त केलेला डंपर नेला चोरून - police
राहुरी येथील महसूल पथकाने काही दिवसांपूर्वी शासनाच्या मालकीची माती व वाळूची तस्करी करताना एक ट्रॅक्टर व एक डंपर असा एकूण १२ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राहुरी येथील महसूल पथकाने काही दिवसांपूर्वी शासनाच्या मालकीची माती व वाळूची तस्करी करताना एक ट्रॅक्टर व एक डंपर असा एकूण १२ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला ट्रॅक्टर व डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात लावली होती. मात्र २५ फेब्रुवारीला २ लाख रूपये किंमतीचा विना नंबरचा ट्रॅक्टर व १० लाख रूपये किंमतीचा एम एच १५ ए जी ११६५ हा डंपर महसूल व पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिंचून वाळू तस्करांनी चोरून नेला. याबाबत महसूल विभागातील लिपीक श्रीकृष्ण सावळे यांच्या फिर्यादीवरून अविनाश भिंगारदे (रा. डिग्रस) व भारत शेडगे (रा. राहुरी खुर्द) या दोघा विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिवाजी खरात करत आहेत.
राहुरी तालुक्यात वाळू तस्करांनी उच्छांद मांडला आहे. तालुक्यातील बारागाव, नांदूर, देसवंडी, ब्राम्हणी, संक्रापूर, वळण आदी भागात नदी पात्रातील शासनाच्या मालकीची वाळू तस्करी राजरोसपणे चालू आहे. या वाळू तस्करांनी बऱ्याच वेळा पोलीस व महसूल पथकावर जीवघेणे हल्ले केले आहेत. तालुक्यात सुरू असलेल्या या वाळू तस्करीला काही प्रमाणात पोलीस व महसूल प्रशासन जबाबदार आहेत. काही अधिकारी या वाळू तस्करांकडून हप्ते घेत आहेत. त्यामुळेच वाळू तस्करांचे फावत होते. अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. ४ दिवसांपूर्वी फसेउद्दीन शेख यांनी राहुरीच्या तहसीलदार पदाचा कार्यभार हाती घेतला. शेख हे हजर होताच तहसील कार्यालयाच्या आवारातून एक ट्रॅक्टर व एक डंपर वाळू तस्करांनी चोरून तहसीलदार फसेउद्दीन शेख यांचे एकप्रकारे स्वागतच केले. महसूल विभागाच्या ताब्यात असलेली वाहने चोरीला कशी गेली. या घटनेमध्ये महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत का? पोलीस ठाण्याच्या आवारात चोरी होत असेल, तर राहुरी तालुक्यातील सामान्य नागरीक किती सुरक्षित आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून होत आहे.