शिर्डी (अहमदनगर) - राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल आज शिर्डीत आले होते. साई दरबारी हजेरी लावत साई मंदिरात जावून त्यांनी साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जयस्वाल यांनी लवकरच शिर्डीत पर्यटन पोलिसांची नेमणूक करण्यात येणार असून येत्या 26 जानेवारीपासून मंदिर परिसरातही पोलिसांची एक चौकी सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीवरून नाराजीचा केला इन्कार
दिल्लीला जाण्याच्या प्रश्नावर स्मित हास्य करत थोडा वेळ थांबून, आयपीएस अधिकाऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारमध्ये कुठेही काम करावे लागत असते. त्यामुळे त्यात काही विशेष नाही. सरकार सांगेल त्यांच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे सुबोधकुमार म्हणाले. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या बघता शिर्डीत पर्यटन पोलिसांची नेमणूक करण्यात येणार असून येत्या 26 जानेवारीपासून साई मंदिर परिसरात पोलीस चौकी सुरू करण्यात येणार आहे. बहुभाषा अवगत असणाऱ्या पोलिसांची शिर्डीत नेमणूक केली जाणार असल्याची माहिती यावेळी सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिली.
शिर्डीतून काही वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या दिप्ती सोनी या काही दिवसांपूर्वी इंदोर येथे मिळून आल्या आहेत. या सोनी प्रकरणी उच्च न्यायलयाने पोलिसांना फटकारले होते. सोनी आता सापडल्याने त्या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून शिर्डीतून गायब होणाऱ्या भाविकांच्या प्रकरणी गांभीर्याने घेण्याची आवशकता असल्याचे जयस्वाल यांनी सांगत या प्रकरणात तपास सुरू असून आवश्यकता पडल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील शिर्डीतून मानव तस्करी होतेय का? या प्रश्नावर बोलताना तपास सुरू आहे. जस-जसा तपास होईल तशा गोष्टी समोर येणार असल्याची माहिती सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिली आहे.