शिर्डी (अहमदनगर) -नाताळ व सलग सुट्ट्या गत वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांच्या गर्दीची रिघ लागली असून यंदा कोरोनाच्या संकटामुळे परिसरातील तंबू (टेन्ट)धारक हॉटेल व्यवसायिक तसेच वन विभाग प्रशासनाच्या नियम व अटींचे पालन करत पर्यटकांना सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
तरुण व्यवसायिक उत्साही
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात दरवर्षी लाखो पर्यटक नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी करत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षीच्या तुलनेत गर्दीवर काहीसा परिणाम जाणवत असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा भीतीचे सावट असले, तरी तरुण व्यवसायिक उत्साही असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येणाऱ्या पर्यटकांची सुविधा खबरदारी व जबाबदारी स्वीकारत वनविभागाने अभयारण्य क्षेत्रात प्रवेश करतेवेळी ठिक-ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा मास्क, सॅनिटाझरचा वापर करा, ळोवेळी हात स्वच्छ धुवा असे सूचना फलक लावले आहेत. तर राजुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनीदेखील नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्यावसायिकांना नियम अटी घालून दिल्या असून कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर तंबू (टेन्ट)धारक तरुण व्यावसायिकांनीदेखील सर्व नियम व अटीचे पालन करत योग्य ती खबरदारी जबाबदारी स्वीकारत पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
अभयारण्य परिसरात प्रवेश नाही
कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात चेकपोस्ट तसेच परिसरात ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्क व सॅनिटाझरचा वापर करण्यासंदर्भात सूचनाफलक लावण्यात आले असून विना मास्कधारकांना अभयारण्य परिसरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे अमोल आडे वनक्षेत्रपाल यांनी सांगितले आहे.