रामनवमी उत्सवाला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली अहमदनगर ( शिर्डी ): शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला आज पहाटेच्या काकड आरतीने सुरवात झाली. आजपासून तीन दिवस साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सव चालणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी साईची प्रतिमा, पादुका आणि साईचरित्राची सवाद्य मिरवणुक द्वारकामाईत पोहचल्यानंतर अखंड साई सचरित्र पठणास सुरूवात झाली आहे.
अखंड पारायणास सुरूवात : परंपरे प्रमाणे साई मंदिरातून साईंची प्रतिमा, विणा व पोथीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी पोथी, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे व प्र. प्रशासकीय अधिकारी संजय जोरी यांनी प्रतिमा घेऊन सहभागी झाले होते. वाजत गाजत ही मिरवणूक द्वारकामाईत पोहचल्यानंतर येथे साईचरित्राच्या अखंड पारायणास सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व त्यांची पत्नी मिनाक्षी सालीमठ यांनी केले. हे पारायण उद्या सकाळपर्यंत सुरू राहणार आहे.
भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल: उद्या रामनवमीचा मुख्य दिवस असल्याने उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होत आहेत. रामनवमी उत्सव आणि पालखीचे एक वेगळे नाते असल्याने या उत्सवासाठी खास करुन मुंबईहून मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल होतात. पंधरा दिवसांचा पायी प्रवास करुन शिर्डीत येऊन साईंच्या दर्शनासाठी भाविक आतुर झालेला असतो. 112 वर्षांची परंपरा असणारा हा उत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो.
उरुस रामनवमी उत्सव: शिर्डीतील रामनवमी उत्सव हा शके १८३३ म्हणजेच १९११ साली सुरू झाला. प्रथम हा उत्सव उरुसापोटी जन्माला आला. त्यावेळी केवळ मोठ्या प्रमाणात उत्सव शिर्डीत भरत असतो. मात्र साईभक्त भिष्म यांनी यांनी हा उरुस रामनवमी उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची साईबाबांना विनंती केली. त्यावेळेपासून साईबाबांच्या आज्ञेनेच भिष्म आणि गोपाळराव गुंड या भाविकांनी रामनवमी उत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून आजपर्यंत ही पंरपरा आणि हा उत्सव सुरू आहे.
देशभरातून भाविकांची मांदियाळी: रामनवमी उत्सवाच महत्व मोठा असल्याने या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांची मांदियाळी देशभरातून शिर्डीत जमते. अषाढीचे वेध लागले की वारकऱ्यांची दिंडी ज्या प्रमाणे पंढरपूरकडे निघते त्याचप्रमाणे रामनवमीसाठी साईभक्तांच्या पायी पालख्या शिर्डीकडे येतात. मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत या प्रमुख शहारांच्या बरोबर अनेक गावातूनही शिर्डीला भाविक पायी चालत येतात. पायी चालत आले की आपल्ली दुःखं, संकट दूर करुन आपल्या मनोकामना साईबाबा पूर्ण करतात अशी भाविकांचा श्रद्धा असते.
आकर्षक फुलांची सजावट: साई नामाच्या गजराने संपूर्ण शिर्डी दुमदुमली आहे. आज उत्सवाचा पहिला दिवस असल्याने रात्री साईंच्या पालखीची गावातून मिरवणूक काढली जाणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. साईमूर्तीलाही विविध अलंकारांनी सजविण्यात आले आहे. साई मंदिरासमोर चार नंबर गेट समोर द्वारकामाई मंडळाच्या वतीने भव्य श्रीराम प्रवेशद्वार उभारले आहे. लेंडीबागेत साई पालखी मिरवणूक व साई प्रसादालयाच्या प्रवेशव्दारावर शिव भोला भंडरी, साई भोला भंडारी हे भव्य देखावे उभारले आहेत. शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी साई बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तानांसाठी पिण्याच्या पाण्याची व राहण्याची व्यवस्था तसेच जागोजागी मंडप व्यस्थाही करण्यात आली.
हेही वाचा:Trupati Desai on Indurikar Maharaj गौतमी पाटीलचे नाव घेऊन इंदुरीकर स्वतःचे महत्त्व वाढवतात तुम्हीच पैशाचाच बाजार मांडला