अहमदनगर- शिर्डीत गुरूपोर्णिमा उत्सवास भक्तीमय वातावरणात भक्तांविना सुरूवात झाली आहे. शनिवारी पहाटे काकड आरती झाल्यानंतर साईंची प्रतीमा, वीणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साई मंदिरापासुन ते व्दारकामाईपर्यंत नेण्यात आली. त्यानंतर अखंड पारायणाचे वाचन करण्यात आले.
शिर्डीत गुरुपोर्णिमाउत्सव तीन दिवस साजरा केला जातो. यंदा उत्सवाचे हे 112 वे वर्ष आहे. शनिवारी पहाटे काकड आरतीनंतर साईंच्या मुर्तीस आणि समाधीस मंगल स्नान घालण्यात आले. त्यानंतर साईंचा फोटो, विणा आणि साईचरित्राच्या ग्रंथाची साई मंदीरातुन गुरुस्थानमार्गे द्वारकामाईत मिरवणुक नेण्यात आली. एरव्ही या मिरवणुकत भक्तांची, विश्वस्तांची गर्दी असते मात्र या वर्षी कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यास मनाई असल्याने साध्या पध्दतीने हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे संस्थानच्या कर्मचाऱ्यांना साईंची प्रतिमा, पोथी आणि विणा घेण्याचा मान मिळाला आहे. या उत्सवानिमीत्त साईमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.