शिर्डी(अहमदनगर)- कंगना रणौतने मुंबईविषयी केलेल्या वक्तव्यावरुन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कंगना आणि भाजपावर टीका केली आहे. जे भाजपाच्या पोटात आहे तेच गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगनाच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे, अशी टीका थोरात यांनी केली. कंगनाला पुढे करुन मुंबई पोलीस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अपमान करणा-या महाराष्ट्र द्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत.कंगनाचा बोलविता धनी कोण आहे हे उघड असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगना रणौतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्याच मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आहे. हा महाराष्ट्रातील 13 कोटी मराठी जनतेचा अपमान आहे. कंगनाने केलेल्या एकाही वक्तव्याचा भाजपाने निषेध केला नाही. भाजपाचे मौन हेच त्यांचा कंगनाला पाठिंबा असल्याचे दाखवत आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येचा मुद्दाही राजकीय करुन त्याचा लाभ उठवण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे, असेही थोरात म्हणाले.
हेही वाचा-कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख
महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही मंडळी अस्वस्थ आहेत. हे सरकार कोणत्याही मार्गाने खाली खेचायचे यासाठी मागील नऊ महिन्यापासून या लोकांनी सर्व उद्योग करुन पाहिले. सुरुवातीला राजभवनच्या आडून सरकार अस्थिर करण्याचे उद्योग केले, त्यात त्यांना यश आले नाही. कंगनासारख्या अभिनेत्रीला हाताशी धरुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम केले आणि आता तर या मंडळींची मजल मुंबईला पाकव्यात काश्मीर म्हणण्यापर्यंत गेली. भाजपाला ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम आहे ना महाराष्ट्राच्या जनतेबद्दल, त्यांना फक्त राजकीय पोळी भाजायची आहे. मात्र, त्यांना यश येणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले.