अहमदनगर - स्वच्छ सर्वेक्षण व वसुंधरा अभियानात गौरवास्पद कामगिरी करणारी शिर्डी नगरपंचायत पर्यावरण रक्षणासाठी विविध पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा साईनगरीत केवळ शाडू मातीच्या गणेश मूर्तींनाच विक्री व स्थापनेसाठी परवानगी देण्याचा निर्णय नगरपंचायतने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली.
रविवारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन -
शहरात केवळ शाडू माती, गवत आदींपासून बनवण्यात आलेल्या पर्यावरण पुरक गणेश मूर्तींनाच विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. गणेश मूर्ती बनवणाऱ्यांना व विक्रेत्यांना वेळीच संदेश देण्यासाठी नगरपंचायतने पुरेशा वेळेपूर्वी हे जाहीर केले आहे. यासाठी महसूल विभाग व पोलिसांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष सचिन उर्फ हरिश्चंद्र कोते यांनी सांगितले. शाडूच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत महाग असल्याने प्रत्येक शाळेने गणेश मूर्ती तयार करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याचा नगरपंचायतचा प्रयत्न आहे. दर रविवारी प्रत्यक्ष अथवा कोविडमुळे ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी बनवलेले या गणेश मूर्तीची घरी प्राणप्रतिष्ठा करावी, असे आवाहनही सर्व नगरसेवकांनी केले आहे.
उत्कृष्ट गणपती बनवणाऱ्यांना बक्षिसे -
या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून उत्कृष्ट गणपती बनवणाया प्रथम तीन विजेत्यांना बांधकाम सभापती अंजली गोंदकर व रवींद्र गोंदकर या दाम्पत्याने बक्षिसांची घोषणा केली आहे. यात प्रथम बक्षीस आमदार राधाकृष्ण विखे पुरस्कार व रोख २१ हजार, द्वितीय बक्षीस, खासदार डॉ. सुजय विखे पाटील पुरस्कार व ११ हजार रोख तर तिसरा क्रमांक- नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर पुरस्कार व ५ हजार रुपये रोख मूर्ती बनवणाया अन्य विद्यार्थ्यांना नगरपंचायतच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.