अहमदनगर - जिल्ह्यातील शिर्डीतील फ्रेंडस मोबाईल दुकानाच्या छातावरील पत्रे कापून चोरट्याने तब्बल ५ लाख रुपयांचे मोबाईल फोन चोरी केल्याची अजब घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. विशेष म्हणजे दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी होताना तर दिसत आहे मात्र, चोर फुटेजमध्ये दिसत नाही. अशा प्रकारची चोरीची घटना पहिल्यांदाच शिर्डी शहरात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शिर्डीतील विठ्ठलवाडी परिसरात असलेले फ्रेंडस मोबाईल दुकानाचे मालक मंगेश लांडगे नेहमी प्रमाणे रात्री दुकान बंद करुन घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानातील सर्व मोबाईल फोन गायब आणि दुकानाच्या छताचे पत्रे कापले असल्याचे त्यांना दिसले. लांडगे यांनी लगेच आपल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. तर, त्यामध्ये छताचे पत्रे कापून खाली एक बॅग सोडून काठीच्या सहाय्याने एक-एक करत सर्व 5 लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन बॅगमध्ये भरून चोर फरार झाल्याचे दिसले.