अहमदनगर- राहाता शहराचे ग्रामदैवत असलेल्या विरभद्र महाराज मंदिरात आज पहाटे ३ च्या सुमारास चांदीच्या मुकुटासह अनेक आभुषणे चोरीला गेली आहेत. चोरलेल्या ऐवजाची किंमत सुमारे चार लाख रुपये असल्याचे समजले आहे. ही घटना मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दोन चोरट्यांनी ही चोरी केली असून चोरलेल्या वस्तूंमध्ये विरभद्र महाराजांचा चांदीचा मुकूट, शंकर, पार्वतीच्या डोक्यावरील मुकूट आणि मंदिरातील इतर दागिन्यांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच लहान मोठी मंदिरे बंद करण्यात आली आहेत. याचाच फायदा घेत चोरट्यांनी मंदिरात हात साफ केला. मंदिरातील पुजारी केवळ दैनंदिन पूजा करतात. आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या भिंतीवरून आत शिरत मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. विरभद्र मंदिराच्या गाभाऱ्यात घुसून चोरट्यांनी चांदीचा मुकूट चोरला. तर, मंदिरातील शंकर पार्वतीच्या मूर्तीवरील मुकूटही चोरट्यांनी लांबवला.