अहमदनगर - कोरोना काळातील कृषी पदवीधरांच्या गुणपत्रिकांवर 'प्रमोटेड कोविड-19' असा शिक्का असल्याच्या गुणपत्रिकांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली होती. अमरावती जिल्ह्यात गुणपत्रिकांवर असे शिक्के असल्याचे वृत्त पुढे आले होते. त्यानंतर आता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने असे कोणतेही शिक्के मारले जात नसल्याचा खुलासा कुलसचिव मोहन वाघ यांनी केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांनी याबाबत माहिती देताना, कृषीच्या सर्व वर्षांच्या तात्पुरत्या गुणपत्रिकांवर (पीपीसी) वर 'प्रमोटेड कोविड-19'चे शिक्के नाहीत. तसेच पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या सेमिस्टरचा निकाल 30 जून रोजी घोषित झाला. तसेच सेमिस्टर दुसरे, चौथे आणि सहावे निकाल घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आठव्या सेमिस्टरचा निकाल घोषित आहे. या सर्व गुणपत्रिकांवर कुठेही 'प्रमोटेड कोविड19' असा शिक्का मारलेला नाही, असे कुलसचिव वाघ यांनी स्पष्ट केले आहे.