अहमदनगर - शिर्डीतील खासगी कार पार्किंगमधून पाच महिन्याच्या दुर्गा नावाच्या चिमुरडीस अज्ञाताने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. चोर मुलीला चोरून घेऊन जात असल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले असून शिर्डी पोलिसांनी अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी मध्यप्रदेशहून शिर्डीत आलेल्या सीमा रावत आपल्या चार मुलींबरोबर किरकोळ हातविक्री करून उदरनिर्वाह करतात. मंगळवारी दुपारी शहरातील कनकुरी रस्त्यालगत असलेल्या खासगी पार्किंगमध्ये महिला पाच महिन्यांच्या दुर्गा या चिमुरडीला झोळीत झोपवून अंघोळीसाठी गेली होती. या दरम्यान अज्ञाताने हे पाच महिन्यांचे बाळ चोरून नेले. यावेळी बाळाजवळ महिलेची अकरा वर्षांची मोठी मुलगी हजर होती. मात्र, त्या मुलीला विचारले असता तिने अज्ञाताचे वर्णन लंगडा आणि लांब केस असलेला माणूस असे केले.