महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'टू-प्लस' अभियानातून जिल्हा पोलिसांनाची तब्बल अडीच हजार गुन्हेगारांवर नजर - अहमदनगर विशेष बातमी

दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगारांचे पोलीस ठाणेनिहाय मेळावे टू-प्लस अभियानातून घेण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाद्वारे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असलेल्यांचे प्रबोधन करण्यात येत असून पुन्हा गुन्हे कराल तर खैर नाही, अशी तंबीही दिली जात आहे.

the two plus Campaign take by SP manoj patil in Ahmednagar district
संपादित छायाचित्र

By

Published : Mar 22, 2021, 5:19 PM IST

Updated : Mar 22, 2021, 6:24 PM IST

अहमदनगर- जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या टू-प्लस योजनेअंतर्गत पोलिसांनी 2 हजार 640 गुन्हेगारांची यादी अद्ययावत केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगारांचे पोलीस ठाणेनिहाय मेळावे घेऊन त्यांचे प्रबोधन करतानाच पुन्हा गुन्हे कराल तर खैर नाही, अशी तंबीही दिली जात आहे. राज्यातील हे पथदर्शी अभियान असणार आहे.

'टू-प्लस' अभियानातून जिल्हा पोलिसांनाची तब्बल अडीच हजार गुन्हेगारांवर नजर

गुन्हेगारांना मार्गदर्शन अन् तंबीही

तुमच्यावर दोन किंवा अधिक गुन्हे दाखल आहेत. याचे कायदेशीर परिणाम तुमच्यासाठी वाईट असणार आहेत. त्यामुळे आता आयुष्य व्यवस्थित जगा. आता पुन्हा गुन्हा केला तर कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी अहमदनगर पोलिसांकडून दिली जात आहे. हा उपक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुरू केला असून त्यातून जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वावर लक्ष ठेवतानाच गुन्हेगारीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांना आता चांगलाच वचक बसणार आहे.

सर्व पोलीस ठाण्यात मोहिमेअंतर्गत मेळावे

टू प्लस योजनेअंतर्गत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आयोजित मेळाव्यात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः गुन्हेगारांची माहिती घेत त्यांना समज दिली. यावेळी दोन व त्यापेक्षा जास्त गुन्हे असलेल्या 40 गुन्हेगारांना बोलावण्यात आले होते. पोलीस उपाधीक्षक विशाल घुमे, सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात आतापर्यंत अशा स्वरूपाचे सहा मेळावे घेण्यात आले आहेत. मालमत्ते संदर्भात गुन्हे करणारे 975 तर शारीरिक इजा करणारे 1 हजार 665 गुन्हे करणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

क्षेत्रफळाने मोठ्या जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्याच्या मध्यभागी असल्याने स्थानिक व बाहेरील गुन्हेगारांचा वावर जिल्ह्यातील काही ठिकाणी दिसून येतो. श्रीरामपूर, नेवासा फाटा, पांढरी पूल, कोल्हार आदी भागात आंतरजिल्हा गुन्हेगार, त्यांच्या जवळ असलेले गावठी पिस्तुल याबाबतीत नेहमी चर्चा आहे. मात्र, आगामी काळात सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले आहे.

राज्यातील पथदर्शी उपक्रम इतर जिल्ह्यात राबवणार

टू प्लस योजनेअंतर्गत अन्य सराईत गुन्हेगारांचा संघटित गुन्हेगारी करणाऱ्या दोनशे टोळ्यांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. या सर्व माहितीवर एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्यामुळे आता एका क्‍लिकवर सराईत गुन्हेगारांची माहिती पोलिसांना मिळणार आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे सोलापूर येथे कार्यरत असताना त्यांनी तेथेही टू प्लस योजना प्रातिनिधिकपणे यशस्वीरित्या राबविली होती. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने ही योजना अतिशय उपयुक्त असल्याने राज्यातील इतर जिल्ह्यातही ही योजना आगामी काळात राबवली जाणार असल्याची माहिती आहे.

आता होणार गुन्हेगारांचे मेळावे

दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती टू-प्लस योजनेअंतर्गत संकलित करण्यात आलेली आहे. या गुन्हेगारांना एकत्रित बोलावून त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव करून दिली जात आहे. यातून पोलिसांची कायमस्वरूपी नजरा गुन्हेगारांवर राहणार आहेत. तसेच एखाद्या गुन्हेगाराने पुन्हा केला तर त्याच्यावर तत्काळ पुढील कारवाई करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा -अहमदनगरच्या पठार भागात झालेल्या गारपीटग्रस्त भागाची महसूल व कृषी विभागाकडून पाहणी

हेही वाचा -2022 पर्यंत निळवंडेच्या कालव्यांद्वारे दुष्काळी भागात पाणी पोहोचवणार - महसूलमंत्री

Last Updated : Mar 22, 2021, 6:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details