महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 4, 2019, 6:46 PM IST

Updated : Sep 4, 2019, 8:10 PM IST

ETV Bharat / state

कथा कारवीच्या जंगलाची...

निसर्गाच्या अद्भूत देणगीनी नटलेलं असे कारवीचे जंगल. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेले हे जंगल घनदाट झाडी, ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, ओढे, नदी, आभाळाच्या दिशेने निघालेले उंच वृक्ष तर कुठे उन्मळून पडलेले शेकडो वृक्ष, असे हे कारवीचे जंगल...प्रचंड मोठ्या शिळा, त्यावर साचलेले हिरवेगर्द शेवाळाचे गालिचे, हिरवा रंग त्याला जणू जन्मजातच मिळालाय..पक्षांची किलबिल, भरदिवसा रातकिड्यांची किरकिर...आणि टपोरा पाऊस अशा देखण्या रूपाने सजलेले हे जंगल...

कारवीचे जंगल

पुणे - निसर्गाच्या अद्भूत देणगीनी नटलेलं असे कारवीचे जंगल. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेले हे जंगल... घनदाट झाडी, ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, ओढे, नदी, आभाळाच्या दिशेने निघालेले उंच वृक्ष तर कुठे उन्मळून पडलेले शेकडो वृक्ष, असे हे कारवीचे जंगल...प्रचंड मोठ्या शिळा, त्यावर साचलेले हिरवेगर्द शेवाळाचे गालिचे, हिरवा रंग त्याला जणू जन्मजातच मिळालाय..पक्षांची किलबिल, भरदिवसा रातकिड्यांची किरकिर...आणि टपोरा पाऊस अशा देखण्या रूपाने सजलेले हे जंगल...

कारवीचे जंगल


हरिश्चंद्र गडाचा पायथा असलेल्या खिरेश्वर गावातून निघालेली पायवाट या जंगलात घेऊन जाते. या वाटेने काही अंतर प्रवास केल्यानंतर नजरेस पडतात काही वीरगळ. या वीरगळ पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. येथूनच काही अंतरावरच एक प्राचीन लेणी आहे. या लेणीपासून जवळच एक प्राचीन असे नागेश्वराचे शिवमंदिर आहे. नवव्या शतकात झंझ राजाने हे शिवमंदिर उभारल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.


या मंदिराची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. मंदिरावराचे दगड निखळले आहेत. आतील गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे. एका कमंडलूतुन यावर सतत पाणी पडत राहतं. गाभाऱ्याच्या वरील भागात अतिशय सुंदर असे नक्षीकाम आहे पण, अपुऱ्या प्रकाशामुळे त्याच्याकडे लक्षच जात नाही. मंदिरात प्रवेश करताना वरील बाजूच्या दगडात अतिशय सुंदर मूर्ती कोरल्या आहेत. हे सुंदर कोरीवकाम पाहत असताना त्या काळातील वैभव नजरेसमोर येते.

नागेश्वर शिवमंदिर


हरिश्चंद्रगडावरून उजव्या बाजूला दिसणारे खोलवर पसरलेले घनदाट जंगल म्हणजेच आडराईचे जंगल. आडवाटेला असल्यामुळे याला आडराईच जंगल असे नाव आहे. पट्टीचे ट्रेकर सोडले तर या वाटेला सहसा कुणी फिरकतही नाही. या जंगलातून अनेक ओढे, धबधबे वाहतात. माळशेज घाटातून दिसणाऱ्या बहुतांश धबधब्याच्या उगम याच जंगलातील डोंगररांगात आहे. येथून वाहणारे छोटे-मोठे धबधबे पुढे जाऊन रौद्र रूप धारण करतात, आणि काळू नदीत विलीन होतात.
अशा प्रकारे इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या या जंगलाची एक वेगळीच ओळख आहे. शांत, सुंदर आणि मनोहर शब्दात वर्णन करावे तितके कमीच असे या जंगलाचे रूप. काळाच्या कितीतरी घटना, आठवणींना आपल्या पोटात घेवून दिमाखात उभे आहे. तर, एकदा नक्की या जंगलाची सफर करावी आणि हा देखावा प्रत्येकानी आपल्या डोळ्यात साठवावा अशीच येथील दृष्ये... तर मग वाट कसली बघताय.... उचला बॅग आणि निघा या अद्भूत दुनियेची सैर करायला.. त्याचे मनमोहक देखावे नजरेत कैद करायला...

Last Updated : Sep 4, 2019, 8:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details