अहमदनगर -गेल्यावर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात राज्य सरकरने मदतीची घोषण केली होती. मात्र अद्यापही ती मदत नागरिकांना मिळाली नाही. आता आलेल्या या चक्रीवादळात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्य सरकारने आता तरी नुकसानग्रस्तांना मदत करावी अशी मागणी विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज कोपरगावमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वतः चे अपयश झाकण्यासाठी प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकारकड़े बोट दाखवण्याची सवय राज्य सरकारला लागली आहे. कधी तरी आत्मचिंतन करून आपण काय केले पाहिजे, याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. कोरोना काळात सर्वांना मिळून काम करायचे आहे. मात्र चांगले झाले तर आम्ही आमची पाठ थोपटून घेतो, आणि अडचणी आल्या तर केंद्राकडे बोट दाखवतो. ही राज्य सरकारची भूमिका योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.